Ad will apear here
Next
‘आनंदपुरुषोत्तमाचे टपाल तिकीट’


पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर पूर्वी व्हरायटी स्टोअर्स नावाचे एक स्टोअर होते. शाळेतून येताना बऱ्याच वेळा त्या दुकानाच्या बाहेर उभा राहून, भल्यामोठ्या काचेतून आतील रॅक्सवर ओळीने मांडून ठेवलेल्या अनेक वस्तू मी पाहत बसे. त्यावर पाडलेल्या प्रकाशामुळे त्या वस्तूंचा चकचकीतपणा अजूनच खुलून दिसे. त्यात अगदी काचेच्या जवळ काही अल्बम ठेवलेले असत. पोस्टाची तिकिटे गोळा करणाऱ्यांसाठी ते अल्बम म्हणजे चैनीचा भाग असे. त्रिकोणी, चौकोनी, आयताकार, षटकोनी तिकिटे चिकटविण्यासाठी त्या आकाराच्या ठिपक्यांच्या ओळी असलेली ती पाने पाहिली, की आमची तिकीटांची साधी वही एकदम केविलवाणी वाटू लागे. पैसे साठवून कधीतरी तो अल्बम घ्यायचाच हा विचार करीत तेथून पाऊले हलवावी लागत. वर्गातल्या काही मित्रांना काड्यापेटीचे छाप जमवण्याचा छंद असे; पण पोस्टाची तिकिटे गोळा करून त्यांचा संग्रह करणारे जरा उच्च श्रेणीतले समजले जात. कारण ज्यांच्या घरी पत्रव्यवहार जास्त होत असे, त्यांच्याकडे जास्त तिकिटे गोळा होत. त्यातही ज्यांचे नातेवाईक परदेशात असत त्या मुलांचा भाव जास्त असे. कारण त्यांच्या संग्रहात विदेशी तिकिटेही असत. मग त्यांची देवाणघेवाण होत असे. एखादे दुर्मिळ तिकीट मिळाले, की खूप आनंद होत असे. ते मित्रांना कधी दाखवू असे होऊन जात असे. बरीच वर्षे हा छंद टिकला. मग कॉलेज शिक्षण व व्यवसाय यात तो छंद एकदम मागे पडून गेला. विस्मरणात गेला.

त्या छंदाची आठवण उफाळून यावी अशी एक घटना घडली. २००२ सालचा मार्च महिना असेल. मला एक फोन आला. पलीकडची व्यक्ती बोलली, ‘मी पीएमजी अनिल जोशी बोलतोय. माझं तुमच्याकडे एक तातडीचं काम आहे. कधी भेटू शकतो आपण?’ मला अनिल जोशी हे नाव कळले होते. पण पीएमजी म्हणजे काय हे कळले नव्हते. अज्ञान प्रकट करायला लागणार होते. तसे मी ते केले. त्यावर ते म्हणाले, ‘मी अनिल जोशी, ‘पोस्ट मास्टर जनरल’, पुणे म्हणून नुकताच रुजू झालोय. कधी भेटू या?’ मग मला वाटले, की त्यांच्याकडून राँग नंबर लागलाय. मी तसे म्हटल्यावर ते घाईने म्हणाले, ‘नाही हो. मी भेटल्यावर तुम्हाला सांगतो. फोनवर सर्व सांगता येणार नाही; पण काम महत्त्वाचं आहे आणि तातडीचंही!’ वेळ ठरली संध्याकाळी साडेचारची. ठिकाण लॉ कॉलेज रोडला फिल्म इन्स्टिट्यूटच्या बाहेर.

मी पाच मिनिटे आधीच जाऊन पोहोचलो. बरोबर साडेचारला एक पांढरी ॲम्बॅसिडर गाडी तेथे येऊन पोहोचली. मी अंदाजाने ओळखले. त्यांनीही मला गाडीत बसण्याची खूण केली. मी गाडीत बसल्यावर अनिल जोशी यांनी सांगायला सुरुवात केली. ‘मी रुजू व्हायच्या आधी काही दिवस येथे उत्तर हिंदुस्थानी बाई ‘पीएमजी’ होत्या. त्यांच्या काळात पु. ल. देशपांडे यांच्यावर टपाल तिकीट काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यांना ‘पुलं’विषयी फारशी माहिती नव्हती. त्यांनी परस्पर त्यांच्या एका कनिष्ठ सहकाऱ्याला ‘पुलं’च्या घरी त्यांचे फोटो आणायला पिटाळले. तो तेथे गेला व त्याने सुनीताबाईंना फोटो हवे आहेत असे सांगितले. कामाचे स्वरूप लक्षात घेऊन सुनीताबाईंनी त्याला ‘चार-पाच दिवसांनी या’ असे सांगितले. सुनीताबाईंनी मुंबईहून फोटो मागवले. त्या फोटोग्राफरने दोनच फोटो पाठवले होते. एक पु. ल. व विजया मेहता असा व दुसरा पु. ल. सिगारेट ओढत आहेत असा. ते फोटो घेऊन तो माणूस ऑफिसवर पोहोचला. ते फोटो मग दिल्लीस पाठवले गेले; पण असे फोटो तिकिटासाठी चालणार नव्हते. त्यामुळे ते रिजेक्ट झाले. तेथून तशी सूचना आली. त्यानुसार परत एकदा तीच व्यक्ती सुनीताबाईंच्यासमोर पोहोचली. त्याने सरळ सुनीताबाईंना सांगितले, की ‘तुम्ही दिलेले फोटो रिजेक्ट झालेत. नवीन फोटो द्या.’ त्या व्यक्तीचे असे बोलणे ऐकून सुनीताबाई वैतागल्याच. त्या म्हणाल्या, ‘माझ्याकडे फोटो नाहीत. तुम्ही ‘पुलं’वर तिकीट काढूच नका. नाही तरी तुम्ही माझ्या नवऱ्याचे तिकीट प्रसिद्ध करणार आणि त्याच्या चेहऱ्यावर परत शिक्का मारणार. त्यापेक्षा तुम्ही तिकिटच काढू नका ना!’ असे म्हणून त्यांनी त्याची बोळवण केली. त्यामुळे तो प्रस्ताव मागे पडला. मी चार्ज घेतल्यावर आधीचे सर्व प्रकल्प बघताना माझ्या ही गोष्ट लक्षात आली. इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग केवळ माहिती करून न घेतल्याने घडला आहे हे जाणवून मी आता त्याला प्रथम प्राधान्य दिलेले आहे. एक मराठी म्हणून मला अभिमानाने सांगता येईल, की माझ्या कारकीर्दीत मी ‘पुलं’वर तिकीट काढू शकलो. मी नुकतेच एका पुस्तकात तुम्ही काढलेले ‘पुलं’चे फोटो पाहिले. मग नाव सर्च करून तुमचा नंबर मिळवला व फोन केला.’

आता माझ्या मनात विचार आला, की यांना आपण फोटो दिले की काम झालं असतं. त्यासाठी इथे असं बोलावण्याचं काय प्रयोजन? त्यांनी बहुतेक माझा विचार ओळखला असावा. कारण ते लगेचच म्हणाले, ‘आपण आत्ता येथूनच सुनीताबाईंना भेटायला जाऊ. मी तुमच्याकडून फोटो घेणार आहे हे त्यांना सांगीन; पण त्यांची त्याआधी समजूत काढावी लागेल. म्हणून तुम्ही बरोबर चला.’

रागावलेल्या सुनीताबाईंच्या समोर आणि तेही त्यांना आधी फोन न करता जाणे हे धाडस होते; पण मी आधीही बऱ्याच वेळी त्यांना फोन न करता गेलो असल्याने व त्यांनी मला सहन केलेलं असल्याने मी होकार दिला.

आम्ही त्यांच्याच गाडीतून पाच मिनिटात ‘मालती-माधव’ येथील त्यांच्या घरी पोहोचलो. बेल वाजवल्यावर सुनीताबाईंनीच दरवाजा उघडला. त्यांच्या नेहमीच्या आवाजात म्हणाल्या- ‘हं, काऽऽय हो?’ मी त्यांना अनिल जोशी यांची ओळख करून दिली. सुनीताबाईंच्या लगेच सगळं लक्षात आलं. त्या म्हणाल्या, ‘काऽऽय हो तुमची माणसं? कसं बोलायचं असतं याचं त्यांना काही शिक्षण दिलेलं नसतं का?’ अनिल जोशी यांनी लगेच त्यांची माफी मागितली. अर्थात सुनीताबाईही लगेचच निवळल्या. त्यांचं नेहमीचं मंद हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आलं. त्या परत म्हणाल्या, ‘आता मी काय करू तुमच्यासाठी?’

ही संधी साधत अनिल जोशी यांनी सुनीताबाईंना ‘फिलाटेली’विषयी इथ्थंभूत माहिती द्यायला सुरुवात केली. ‘जगभरात लहान–थोर असे करोडो लोक पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद जोपासतात. त्यातून आपल्याला जगभराचा चित्रमय इतिहास पाहायला मिळतो. प्राणी, फळे-फुले, शास्त्र, कला, उद्योग याबरोबरच जगभरातील महान व्यक्ती, इतिहासकार, कलाकार, शास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ यांचे स्मरण आपल्याला पोस्टाच्या तिकिटांवर झालेले दिसते. अशी प्रसिद्ध झालेली तिकिटे जमवण्याच्या छंदास ‘फिलाटेली’ असे म्हटले जाते. फिलाटेलिस्ट हा फक्त तिकिटे जमवतो असे नाही, तर त्या तिकिटांच्या व त्या अनुषंगाने छापल्या जाणाऱ्या एरोग्राम, पोस्ट कार्ड, पत्रके, नोंदणीकृत लिफाफा, मुद्रित लिफाफा, प्रथम दिवस आवरण या सर्वांची छपाई, संरचना यामध्येही त्याला रस असतो व या सर्वांचा संग्रहही तो करीत असतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट एकदा म्हणाले होते, की ‘माझा तिकीटसंग्रह ही अशी एक जागा आहे, की जेथे सर्व देश गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.’ हा असा छंद आहे, की ज्यामुळे लोकांच्या मनात शांती आणि प्रेम याचा संदेश आपोआप पसरला जातो.’ असे सांगत त्यांनी ‘पुलं’वरील स्मरणार्थ तिकिटाचे आपल्याला कसे महत्त्व आहे हेही पटवले.

त्यांच्या या सविस्तर कथनाने सुनीताबाईंच्या मनातील आधीच्या भावना नाहीशा झाल्या. त्या उठल्या व ‘पुलं’वरील ‘चित्रमय स्वगत’ हा ग्रंथ जोशी यांना दाखवत म्हणाल्या, ‘याचा काही उपयोग होईल का पाहा. यात भाईचे शेकडो फोटो आहेत.’ जोशी यांनी तो ग्रंथ चाळला व म्हणाले, ‘मी जाता जाता डेक्कन जिमखान्यावरून हा ग्रंथ घेईन.’ अचानकपणे सुनीताबाई माझ्याकडे हात करीत म्हणाल्या, ‘अहो, ह्यांनी काढले आहेत की खूप फोटो भाईंचे. यांच्याकडून घेता येतील तुम्हाला.’ जोशी म्हणाले, ‘हो, मला माहीत आहे. त्यांना मी सांगणारच आहे.’ चहापान झाले आणि आम्ही तेथून आनंदात निघालो. मलाही हुश्श झाले होते.

जोशी यांनी केलेले वर्णन ऐकल्यामुळे मी त्यांना म्हणालो, ‘मी तुम्हाला काही फोटोंच्या प्रिंट्स करून देतोच; पण त्या बरोबर स्टॅम्प, फर्स्ट डे कव्हर व कॅन्सलेशन स्टॅम्पचे डिझाइनही करून पाठवतो. त्याची निवड झाल्यास उत्तमच. नाही तर मला मी काही काम केल्याचे समाधानही मिळेल.’ आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पुढच्याच आठवड्यात अनिल जोशी यांना मी त्यांच्या मुख्य पोस्ट ऑफिसमधील कार्यालयात सर्व साहित्य नेऊन दिले. त्यांनी ‘चित्रमय स्वगत’ व मी दिलेले सर्व साहित्य दिल्लीस पाठवून दिले.

जवळजवळ दीड महिन्याने मला अनिल जोशी यांचा फोन आला. तारीख होती सहा मे २००२. त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले, ‘पाकणीकर, तुमचा फोटो ‘पुलं’च्या तिकिटासाठी निवडला गेला आहे. त्या तिकिटाचं डिझाइन आजच मला दिल्लीहून आलं आहे; पण तुम्ही आत्ताच ही बातमी कोणाला सांगू नका. पुढच्या महिन्यात १६ जूनला पुण्यातच त्याचं प्रकाशन माहिती आणि नभोवाणी मंत्री श्री. प्रमोद महाजन यांच्या हस्ते होणार आहे. निमंत्रण मी देईनच तुम्हाला.’ त्या फोननंतर काहीच वेळात त्यांनी मला त्यांना आलेली मेल फॉरवर्ड केली. झाले ते सर्व स्वप्नवतच घडले होते.

१६ जून २००२. आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या सन्मानार्थ निघणाऱ्या पोस्टाच्या तिकिटाचा कार्यक्रम ‘याचि देही याचि डोळा’ पाहता यावा यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात रसिकांनी तुफान गर्दी केली होती. प्रमुख पाहुणे होते आदरणीय पं. भीमसेन जोशी. ‘बहुविध गुण असणाऱ्या ऋषीतुल्य पु. ल. देशपांडे यांच्या सन्मानार्थ त्यांचे टपाल तिकीट काढून कळत न कळत मी ‘पुलं’ना आपली गुरूदक्षिणा अर्पण केली आहे. ते आम्हाला पुण्यात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात रेडिओ पत्रकारिता हा विषय शिकवण्यास येत असत. हे ऋण फेडण्याची संधी योगायोगाने मी या खात्याचा मंत्री असताना मिळाली हे मी माझं भाग्य समजतो,’ अशा भावपूर्ण उद्गारांसह प्रमोद महाजन यांनी ते तिकीट, प्रथम दिवस आवरण व कॅन्सलेशन स्टॅम्प या सर्वांचे प्रकाशन केले. भीमसेनजी म्हणाले, ‘गाणे, साहित्य आणि कलांवरील प्रेमामुळे पु. ल. देशपांडे कायम अमरच आहेत.’

‘पुलं’ची बहुविधता दाखवण्यासाठी या तिकिटावर त्यांच्या प्रकाशचित्रासह, मागे ‘जोहार मायबाप’मधील त्यांनी साकारलेला चोखामेळा, लेखणी, पुस्तक, रंगमंच, चित्रफीत व त्यांची स्वाक्षरी अशी चित्रं विराजमान आहेत. प्रथम दिवस आवरणावर त्यांच्या ‘बटाट्याची चाळ’मधील सहा प्रतिमा, तर कॅन्सलेशनच्या खास शिक्क्यात तानपुरा व लेखणी एकाकार झाले आहेत.

कार्यक्रम झाला; पण तो पाहण्यास सुनीताबाई मात्र येऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे काही मोजक्याच व्यक्तींसह श्री. प्रमोद महाजन ‘मालती-माधव’वर पोहोचले. अनिल जोशी यांनी मलाही येण्याचे आमंत्रण दिले. आम्ही सर्व पोहोचलो. तिकीट व त्याबरोबरचे सर्व साहित्य पाहून सुनीताबाईंना किती आनंद झाला आहे हे त्यांच्या डोळ्यात जमलेले आनंदाश्रूच सांगत होते. श्री. अनिल जोशी यांनी पुढे येत श्री. प्रमोद महाजन यांच्या हस्ते मला भारतीय टपाल खात्यातर्फे तिकीट, प्रथमदिवस आवरणावर चिकटवलेले तिकीट, त्यावर उमटवलेला कॅन्सलेशन स्टॅम्प व या तिकिटाची विवरणिका (ब्रोशर) असा एक सुंदर अल्बम भेट म्हणून दिला.

कविवर्य कुसुमाग्रज ‘पुलं’विषयी यथार्थपणे म्हणतात, ‘आपापले कार्यक्षेत्र व्यापून टाकणारे प्रतिभावंत असतात; पण त्यातला एखादाच आपल्या समाजाच्या समग्र संस्कृतीलाच व्यापून उरतो. पीएल हे असे विरळा प्रतिभावंत आहेत. मराठी संस्कृतीच्या वेगवेगळ्या अंगात जे जे सत्त्वशील, सुंदर, उदात्त, उन्नत, नवनिर्मितीशील, सुरेल, नाट्यपूर्ण व मूल्ययुक्त आहे ते ते पीएलच्या व्यक्तिमत्त्वात आणि कलानिर्मितीत व्यक्त झाले आहे.’

व्हरायटी स्टोअर्सच्या त्या काचेमागील ते तिकिटांचे अल्बम तेव्हा माझ्या नशिबात नव्हते; पण मराठी सारस्वताचा मुकुटमणी असलेल्या, मला वेगवेगळ्या संगीत मैफलींना आमंत्रण देऊन संपन्न करणाऱ्या, माझ्या सुरुवातीच्या काळात माझं मनोमन कौतुक केलेल्या, ‘एनसीपीए’च्या संगीत विभागासाठी माझी प्रकाशचित्रं विकत घेणाऱ्या त्या आनंदपुरुषोत्तमाच्या सन्मान तिकिटावर मी टिपलेलं त्यांचं प्रकाशचित्र निवडलं जावं व त्यांच्या ऋणातून काही अंशानं का होईना उतराई व्हावं, हे त्या नियतीच्याच मनात होतं ना? आणि आदरणीय सुनीताबाई, पं. भीमसेनजी व श्री. प्रमोद महाजन यांच्या स्वाक्षऱ्यांसह अमूल्य झालेला तो खास असा तिकीट अल्बम माझ्या संग्रही कायम राहावा, हेही त्या नशिबानेच ठरवले असणार ना?

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QYSZCO
Similar Posts
गृहिणी-सखी-सचिव (उत्तरार्ध) परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्या वेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या
गृहिणी-सखी-सचिव (पूर्वार्ध) सुनीताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच; पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास.
बळवंतराव मोरेश्वरराव... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्मदिन तिथीने नागपंचमीला असतो, तर त्यांची जन्मतारीख २९ जुलै. त्या निमित्ताने, प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा हा लेख...
... आणि असा साकार झाला ‘अशी ही बनवाबनवी’चा ‘टर्निंग पॉइंट’ ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झाला होता. म्हणजेच त्याला आता ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही त्या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. ‘आणि या मिसेस बालगंधर्व’ हा या चित्रपटातला डायलॉग ऐकून आणि पाहून तुम्ही अनेकदा खळखळून हसला असाल. तोच या चित्रपटाचा ‘टर्निंग पॉइंट’ आहे. तो प्रसंग पु

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language